Monday 22 February 2010

जिंकलस रे !!!

जिंकलस रे !!!
हे वाक्य मी चांगल्या गाण्यासाठी म्हणत नाहिये, मी म्हणतोय पुण्यासाठी.

"१३ फेब." कोणी म्हणते पुणेरी पगड़ीला कालिमा लागला, कोणाला वाटते पुण्याची शांतता बिघडली, नजर लागली. मला  इतके नाही कळत, पण जे काही झाले ते खुप वाईट होते.

त्या संध्याकाळी मी मित्रांसोबत कोथरुडला होतो, आणि मुम्बईहुन फोन आला. बातमी ऐकून मी आणि सगळे मित्र थक्कच झालो. बॉम्ब स्फोट आणि पुण्यात?   १० लोक मृत आहेत आणि भरपूर जखमी? त्यानंतर एकापाठोपाठ एक असे  ८-१० फ़ोन येऊ लागलेत. भीती वाढतच होती, झालेल्या गोष्टीबद्दल मनातला रोष त्यापेक्षाही जोर धरत होता. आणि प्रत्येकाच्याच चेहर्यावर तेच भाव तेच प्रश्न  जे मुम्बईत स्फोट झाला तेव्हा होते, मालेगाव-धूळ्यात दंगली उसळल्यात तेव्हा होत्या.

त्यानंतर एक मित्राने कळवले की "AB+" रक्त गटाच्या रक्ताची गरज आहे जहाँगीर हॉस्पिटल मधे, आणि एक नंबर पण दिला. मग सागर म्हटला माझे रक्त "AB+" आहे आम्ही कट्ट्यावरून लगेच उठलो आणि  तत्पर हॉस्पिटलला गेलो. गेल्यावर गेटजवळच एक माणसाने आम्हाला येण्याचे कारण विचारले, जसे त्याला माहितीच होते आम्ही का आलोय ते. त्याने माहिती दिली की इथे पुरेसा साठा झालाय आता ससून अणि कैंप हॉस्पिटल मधे गरज आहे. क्षणाचाही विचार न करता आम्ही ससून ला गेलो, तर तिथेही तीच परिस्थिति. तेव्हा कळाले की पुणे काय चीज आहे. आमच्या आधी पुण्याने हजेरी लावली होती तिथे, कधीच ! आणि वाटले की व्वा !! मी पुण्यात रहतोय, जिथे दिवसेंदिवस प्रदुषण, ट्राफिक, लोकसंख्या वाढतेय. माणसाला आपल्या घरात लक्ष द्यायला वेळ नाहीये. पण पुण्यावर आलेल्या संकटाचा सामना करायला आज सगळे तयार आहेत..  फ़क्त लाज वाटते एवढीच की दोन चार उनाड पोर येउन असा धुमाकुळ घालून जातात आणि आपण त्यांना थांबवू शकत नाहीत...

कोण करतात? का करतात? माणसच असतात ना ही? मग इतकी निर्दयी? पण एक नक्की हे लोक कोणत्या जाती धर्माचे नसतात. ते फ़क्त बिनडोक लोक. जे स्वत:चे मानसिक सतुलन बिघडल्यामुळे  असे अमानवी क्रुत्य करतात. पण याचे कारण हे नाही की ते खुप ताकदवान आहेत..शेवटी मांजर कितीही चपळ असली तरी रोज उंदीर खात नाहीं..कारण उन्दरे बीळात लपून राहतात आणि मांजराचे लक्ष नसतानाच गोंधळ घालू शकतात. तेच ते आपल्या घरात राहणारे नावडते पाहुणे...

पण बस !! किती परीक्षा घ्यायची एखाद्याची? कोणाचा किती अंत पहावा हे कळत नसावे नाहीतर आज आपले मित्र असते आपल्याच सारखे, आपल्या सोबत वावरले असते, आपले शेजारी असते. पण शेवटी त्यांचे दुर्दैव !!

त्यांना "WEDNESDAY" हा MOVIE  दाखवावा, जेव्हा एक सामान्य माणुस त्यांच्या विरोधात उभा राहिल ना, या उन्दराना पळता भुई थोड़ी होइल. रेडियो मिर्ची ऐकत असतील तर एक मित्राचा निरोप होतो त्यांच्या साठी, नसेल तर सांगतो

"असेल दम तर समोर येउन लढा!! लपाछुपी बस करा ! !  "

Tuesday 16 February 2010

मनातल्या मनात !!!


जगासाठी रडत आलोय, आज तू माझ्यासाठी रडशील?
बिथरणारी पावले पाहून, एकदा हक्काने चिड्शील?
नसानसात भिनतेय विचारांची ज्वाला,
जवळ मला करून तिला शमवशील?

सांग ना, माझ्यासाठी इतकेसे करशील? 

Wednesday 3 February 2010

जीर्ण कागदे !


आजच पाकिटात ठेवलेले कागदे काढत बसलो होतो। आणि खुप दिवसांपासून "सांभाळून" ठेवलेली पत्रे हाती लागलीत। जास्त नाहीत ती २-३ आहेत, पण ती पाकिटातुन निघताना स्वतः च्या अंगावर लिहिलेल्या सगळ्या भावना, क्षण, स्थळ सगळे सांगू लागले।

पण त्यांचा स्वर जरा नाराजच होता। आणि का नसावा? आज किती दिवसांनी माझे त्यांच्याकडे लक्ष गेले, त्यांना पाकिटात ठेवतांना किती विचार आले होते, खरे तर माहितच नव्हते की मी त्यांना का सांभाळतोय। हसू येतय स्वतः वर, कारण ? मला अजुनही उमगले नाहिये.  

    प्रत्येक घडी उघडतांना, भीती वजा काळजी सतवत होती। पाने इतकी झिजली होती की कोणत्याही क्षणी दोनाचे चार होतील, जसे आपण एकाचे दोन।      


पण आज त्या गोष्टींना काही एक अर्थ नाहीये। सोबत घालवलेला प्रत्येक क्षण, आणि त्या प्रत्येक क्षणात दिल्या-घेतलेल्या शपथा ओघळलेले अश्रुअगदी सगळच त्या पत्रांप्रमाने धूसर अणि जीर्ण झालेत। म्हणुनच आज दिलेल्या प्रत्येक गोष्टीला दूर करताना इतके दुःख होत नाहीये जितके तू दूर जाताना झाले।

जातांना सगळे घेउन गेली असतीस तर बरे झाले असते। आज त्यांना स्वतःच्या हातांनी फाड़तांना हात कापले नसते।






Thursday 28 January 2010

वाट

वाट तुझी पहाताना वाटते की घड्याळयाच्या काट्यांनी कसे मोटारीसारखे पळावे
घाईत जीने मोजताना, अर्ध्यातच तू दिसावे !
पण या भेटीची वेळ इतक्या लवकर सरते की वाटते,
वाटते घड्याळयाच्या काट्यांनी पळूच नये, फ़क्त तुझ्याशी बोलेपर्यंत त्यांनीही थोड़े थांबावे।

Wednesday 27 January 2010